वाट पहाणे ( इंतजार )
खरंच शब्द तसा छोटाच आहे.पण अर्थ खूप मोठा आहे.माणूस जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत फक्त वाटच पहात असतो.बाळ जन्माला कधी येणार म्हणून घरातील सर्व जण आतुरतेने वाट पहात असतात.जन्माला आले की,ते चालणार कधी, बोलणार कधी,जेवणार कधी याची वाट पाहायची.दात आले की नाही, कधी येतील ती वाट पहायची.मग त्याला चांगल्या शाळेत प्रवेश कसा मिळेल याची वाट पाहत बसायचे.शिक्षण , रिझल्ट,डिग्री आणि नोकरी याची सुद्धा,प्राण एकवटून वाट पहावी लागते.एकापेक्षा जास्त मुले असतील तर वाट पहाणे आणखीनच वाढते.मग लग्न ठरण्याची,घरात,सून,जावयी येण्याची वाट पहायची.असे हे वाट पहाणे संपतच नाही.
आठ महिने झाले, आपण डोळ्यात प्राण आणून वाट पहात आहोत.लॉकडावून कधी संपेल,आपण मोकळा श्वास कधी घेऊ?कोरोना कधी जाईल,?कोरोनाची लस कधी येईल? नुसते वाट पहाणे.हॉस्पिटलमध्ये गेले की,आपला नंबर येण्याची वाट पहात बसणे, अपॉइंटमेंट घेतलेली असते तरी डॉक्टरांची वाट पहात बसणे.पण तोंडातून एक शब्द न काढणे.आता तर मास्क लावलेला असतो त्यामुळे बोलायचा प्रश्नच नाही.तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करायचा.त्याशिवाय दूसरा पर्यायच नाही.गेले कित्येक वर्षे अच्छे दिन कब आयेंगे?याची वाट पहात बसलो आहोत.मेडिकलमध्ये नंबर येण्याची वाट पहाणे, आणि शेवटी माणूस गेला तरी,वाट पहाणे संपत नाही.अॅंब्युलन्सची वाट पहायची, आणि शेवटी स्मशानात सुद्धा आपला नंबर येण्याचीच वाट पहायची.वाट पाहून पाहून आयुष्याची वाट लागते.माणसाचा जन्म व्यर्थ, आणि मरणं त्याहूनही जास्त व्यर्थ! आपल्या देशात, आपल्याच घरात, आपल्याच मालकीचे सर्व काही असतांना, भरपूर पैसे देऊन सुद्धा नुसती वाट पहावी लागते.विशेष म्हणजे हे फक्त भारतातच आहे.दूसऱ्या विकसित देशांमध्ये असे काहीच नाही.तरीही छाती ताणून म्हणायचे'मेरा भारत महान'
👏👏
सौ.कमल सोनजे
Comments
Post a Comment